अभिजीत वंजारींच्या विजयाने बल्लारपुरात महाविकास आघाडीचा जल्लोष
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यावर ३ हजार २७१ मतांनी मात करत विजय मिळविला. तब्बल ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या चुरशीच्या मतमोजणीनंतर वंजारी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या विजयाचा आनंद बल्लारपुरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.
या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रमाची मिळून एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली, तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. अखेर ३ हजार २७१ मतांच्या फरकाने वंजारी यांनी बाजी मारली.
निकाल जाहीर होताच बल्लारपुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गुरुवारी दुपारी १२ वाजता नगर परिषद चौकात महाविकास आघाडी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि इतर संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला. या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
या जल्लोषात नगराध्यक्षा डॉ. अल्का अनिल वाढई, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, छाया मडावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, डॉ. अनिल वाढई, सिनेट सदस्य दीपक धोपटे, नगरसेवक भास्कर माकोडे, करुणा रेब्बावार, शिल्पा चुटे, मोना धानोरकर, अंकु भुक्या, मनोज बेले, अफसाना सैय्यद, इंदू राजुरकर, सपना मोरे, प्रियंका नाईक, सुवर्ण मुरकुटे, ज्योती गहलोत, प्रा. बल्की, प्रा. अनिल वाग्दरकर, प्रकाश पाठक, प्रा. युवराज बोबडे, किसन पोडे, मनोहर मालेकर, श्रीधर फटाले, चेतन गेडाम, नरेश आनंद, गणपत इटणकर, डेव्हिड कम्पेल्ली, फहीम शेख, बाबू राशिद, फारुख शेख, रवी बेले, अनिल खरतड, आर. आर. यादव, युसूफ शेख, संजय झिल्लेवार, सुधाकर पोपळे, प्रभाकर मुरकुटे, महमूद पठाण, सादिक शेख, अस्लम शेख, नाना बुंदेल, अजय जुमडे, दिलीप मकोडे, सुधीर अमराज, प्राणेश अमराज, नितीन तेलंग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.